मला स्वदेशी चळवळीतील सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांना एक विनम्र आवाहन करायचे आहे. आता वेळ आली आहे कि हा लढा केवळ भावनिक न राहता खुल्या बाजारात (श्रेष्ठ दर्जा आणि वाजवी दर असलेला माल) स्पर्धात्मक आव्हानाच्या रूपाने उभा करावा. कारण केवळ भावनात्मक आवाहन स्वदेशाच्या भरभराटीस चालना देण्याऐवजी चळवळीच्या अस्तित्त्वावरच संकट निर्माण करू शकते. भावना ना तर आर्थिक घडामोडींची जागा घेऊ शकतात नाही मुलभूत गरजा भागवू शकत त्या केवळ आपले लक्ष विचलित करू शकतात. एवढेच नाही तर स्वदेशी चळवळीचा उद्देश हा परकीय मालाला विरोध नाही तर स्वदेशी मालाची विक्री आणि व्यवसाय वाढविणे हाच अपेक्षित आहे.
जर स्वदेशी माल श्रेष्ठ दर्जाचा आणि वाजवी किंमतीचा असेल तर मला स्वतःला देखील स्वदेशी माल खरेदी कायला आवडेल. मुळातच उच्च दर्जाची आणि वाजवी किमतीची कुठलीही वस्तू विकत घेणे अथवा निवडणे हा ग्राहकाचा मुलभूत अधिकार आहे. आणि त्यातच भारतीय ग्राहक चोखंदळ आहे हे काही वेगळे सांगायला नको. म्हणून, जर चार पैसे वाचणार असतील ते वाचवावेत ह्या मताचा मी आहे. स्वदेशी माल जर गुणात्मक दृष्ट्या चांगला आणि तोडीस तोड स्पर्धा करणारा असेल तर तो परदेशी मालापेक्षा जास्त यशस्वी होईल कारण त्यावेळी अशा मालाला एक वैशिष्ठ्य असेल ते म्हणजे तो “स्वदेशी” आहे. आणि हे साध्य करायचे असेल तर चाणक्यांनी जवळपास २४०० वर्षांपूर्वी सांगितलेले मुक्त बाजाराचे आणि आर्थिक विचारांची शिदोरी यथायोग्य वापरणे क्रमप्राप्त आहे.
पतंजली आयुर्वेद ह्या संस्थेने स्वदेशी मालाचा नुसताच भावनिक मुद्दा ना करता वाजवी दराची गुणात्मक उत्पादनांची निर्मिती करून स्वदेशी मालाला प्रोत्साहन दिले. आणि ह्यामुळेच त्यांनी देशातील आणि विदेशातील मोठ्या संस्थांना एक आव्हान उभे केले आहे. परंतु ह्याच वेळी चाणक्यांनी वेळोवेळी प्रतिपादित केली गोष्ट म्हणजे “नफा वाईट नसतो” ह्याचा विसर पडता कामा नये. अन्यथा कुठलाच आर्थिक उपक्रम दीर्घ काळ टिकणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
केवळ निष्क्रिय विरोध आपल्याला उत्कर्षाकडे घेऊन न जाता स्वयं ऱ्हास आणि तिसरे-जग हा दर्जा अखंड ठेवायला मदतच होईल. आणि मला वाटते कि स्वदेशी चळवळीचा असा उद्देश्य नक्कीच नाही, बरोबर? आपल्याला भरभराट, पूरक संधी आणि योग्य स्पर्धा ह्यांची निकडीची आवश्यकता आहे जेणेकरून आपण हे सिद्ध करू शकू कि आमच्या पूर्वजांनी जे वैभव कमावले होते ते आम्ही परत मिळवू शकतो.
होय मला खात्री आहे कि आपण पुन्हा एकदा जगातील सर्वात कार्यक्षम आणि श्रीमंत देश हे बिरुद मिरवू शकतो फक्त आपल्याला जे ज्ञान वंशपरंपरेने प्राप्त आहे ते स्वीकारण्याची आणि वापरण्याची आवश्यकता आहे. आपल्याला चाणक्यांनी जे धोरणं वापरली तेच धोरणं आधुनिक युगाशी जुळवत स्वीकारायचे आहेत. चाणक्यांच्या ह्याच सुत्रांमुळे इतिहासातील बलाढ्य, बलशाली आणि संपन्न भारताची स्थापना शक्य झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून १७व्या शतकापर्यंत जगातील एकूण उत्पन्नाच्या २५% वाटा हा भारताचा होता. आणि आज आपला वाटा केवळ ५% इतका उरला आहे. आपणाला गेल्या ४-५ शतकांमध्ये ज्या समाजवाद नावाच्या अशास्त्रीय आणि निसर्ग विरोधी रोगाची लागण झाली आहे त्यापासून मुक्त होणे आत्यावश्यक आहे.
जय भारत!





