स्रोत: प्रा. र. पं. कंगले ह्यांच्या भाषांतरित ‘कौटिलीयम् अर्थशास्त्रम्’ ग्रंथामधून.
राजनितीवर पंथ-निरपेक्षपणे विचार करणारे प्राचीन भारतातील एकमेव शास्त्रीय लेखन. ह्या शास्त्रामध्ये सर्वस्वी इहलोकीच्या गोष्टींचाच विचार केला आहे.
सध्याच्या काळात अर्थशास्त्र हा शब्द ‘इकॉनॉमिक्स’ या अर्थी उपयोगात आणला जातो. परंतु ह्या ग्रंथाचा विषय तो नाही. १५व्या अधिकरणातील अर्थ ह्या शब्दाची व्याख्या:
“अर्थ म्हणजे उपजीविका, म्हणजेच मनुष्याची वस्ती असलेली भूमी. त्या भूमीचा म्हणजे पृथ्वीचा लाभ आणि तिचे पालन यांचे उपाय सांगणारे शास्त्र ते अर्थशास्त्र”(१५.१.१-२)
‘अर्थ’ म्हणजे इहलोकीच्या जीवनाची समृद्धता हा त्या शब्दाचा मूळ अर्थ. आणि हि समृद्धता संपत्तीमुळे प्राप्त होते. म्हणून संपत्ती असा ह्या शब्दाचा अर्थ होतो. सर्व प्रकारच्या संपत्तीच्या उत्पादनाला मनुष्याचे श्रम कारणीभूत होतात आणि हे उत्पादन अंततः भूमीतून – शेतांतून, खाणींतून - वैगेरे प्राप्त होते. तेव्हा संपत्तीनिर्मितीच्या मनुष्य व भूमी ह्या दोन्ही घटकांचा एकत्र निर्देश असलेला ‘मनुष्यांची वस्ती असलेला भूप्रदेश’ असा ह्या शब्दाचा अर्थ सहज निष्पन्न होतो.
पृथ्वीचा लाभ व पालन हि जी अर्थशास्त्राची दोन उद्दिष्टे त्यापैकी लाभाचा विचार म्हणजे मुख्यत्त्वेकरून एका राष्ट्राच्या दुसऱ्या राष्ट्रावरील आक्रमणाचा विचार. त्या संदर्भात साहजिकच परराष्ट्रसंबंधाचे विवेचन करणे क्रमप्राप्त होते. पालन करायचे ते पृथ्वीचे आणि तिच्यावरील माणसांचे. पृथ्वीचे पालन म्हणजे राष्ट्राचे रक्षण. ते रक्षण मुख्यतः शत्रूपासून करावयाचे असते. हा विषयही परराष्ट्रसंबधात अंतर्भूत आहे. राज्यातील मनुष्यांचे पालन म्हणजे त्यांचे दैवी आणि मानुषी आपत्तीपासून रक्षण करणे एवढाच अर्थ नसून त्यांच्या योगक्षेमाची काळजी वाहने हा अर्थ सुद्धा अभिप्रेत आहे. लोकांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या योगक्षेमाची काळजी घेण्यासाठी कारभाराची मोठी यंत्रणा उभारणे आवश्यक असते. म्हणून अंतर्गत राज्यकारभाराचा विचार हे शास्त्राचे दुसरे अंग. ह्या दोन्ही अंगांचे – अंतर्गत राज्यकारभार आणि परराष्ट्रसंबंध यांचे – अत्यंत विस्तृत विवेचन कौटिलीय अर्थशास्त्रात केले आहे.
जय भारत!
Related: Quotes by Chanakya







